तुमचा डेटा हटवणे
खातं किंवा मंडळाच्या नोंदी कशा काढून टाकायच्या, आणि त्याने काय होतं.
शेवटचा बदल: २३ ऑगस्ट २०२६
एकच नोंद काढून टाकणं
कोणतीही नोंद ती करणारा सदस्य, किंवा खजिनदार अथवा अॅडमिन अॅपमधून काढून टाकू शकतो.
पावती क्रमांक मात्र वापरलेलाच राहतो. बुकात खाडा पडलेला ऑडिटर विचारतो, म्हणून तो क्रमांक पुन्हा कुणालाच दिला जात नाही.
मंडळ सोडणं
अॅडमिनला तुम्हाला काढून टाकायला सांगा. तुमच्या खात्याचा प्रवेश लगेच संपतो. तुम्ही केलेल्या नोंदी मंडळाच्या वहीत राहतात, कारण त्या तुमच्या नव्हे तर मंडळाच्या नोंदी आहेत.
मंडळ बंद करणं
सुपर अॅडमिन अॅपमधून मंडळ बंद करू शकतो. सगळे सदस्य मोकळे होतात आणि जॉइन कोड बंद होतो.
बंद केलेल्या मंडळाच्या नोंदी कायमच्या पुसण्यासाठी सुपर अॅडमिनच्या ईमेलवरून मंडळ कोडसह आम्हाला लिहा.
खातं आणि त्यातलं सर्व काही हटवणं
अॅपमध्ये आणखी → कायदेशीर → खातं बंद करा इथे जा आणि सरकवून खात्री करा. दुसरं काही करावं लागत नाही, कुणाला लिहावं लागत नाही.
विचार बदलायला सात दिवस मिळतात. तोपर्यंत काहीही हटत नाही — पुन्हा लॉगिन केलं की विनंती रद्द होते, आणखी काही करावं लागत नाही.
सात दिवसांनंतर तुमचं सदस्यत्व आणि लॉगिन आपोआप हटतं. तुम्ही केलेल्या नोंदी मंडळाच्या वहीत तुमच्या नावासह राहतात; त्या मंडळाच्या नोंदी आहेत, तुमच्या नाहीत.
मंडळाचे एकमेव सुपर अॅडमिन खातं बंद करू शकत नाहीत — तसं केलं तर समितीची वही अशा खात्यामागे अडकेल जिथे कुणीच लॉगिन करू शकत नाही. आधी मंडळ बंद करा, किंवा दुसऱ्या सदस्याकडे देण्यासाठी आम्हाला कळवा.
कायद्याने ठेवावी लागणारी नोंद — उदा. करासाठीची पेमेंट नोंद — तेवढा काळ ठेवली जाते, त्याहून एक दिवसही जास्त नाही.
हटवण्याने काय होत नाही
देणगीदारांपर्यंत आधीच पोहोचलेल्या पावत्या त्यांच्या फोनवर असतात आणि परत मागवता येत नाहीत.
बॅकअप आपल्या वेळापत्रकाने संपतात; हटवलेला डेटा त्यांतून ९० दिवसांत निघून जातो.