गोपनीयता धोरण
आम्ही काय ठेवतो, का ठेवतो, आणि त्याचं काय कधीच करणार नाही.
शेवटचा बदल: २३ ऑगस्ट २०२६
आम्ही काय गोळा करतो
समिती सदस्यांकडून: तुम्ही ज्या Google खात्याने साइन इन करता त्यावरचं नाव, ईमेल आणि प्रोफाइल फोटो. तुमचा Google पासवर्ड आम्हाला कधीच दिसत नाही आणि आम्ही तो साठवत नाही.
तुम्ही जे नोंदवता: तुमच्या मंडळाच्या नोंदी — रक्कम, हेड, पेमेंट प्रकार, दिनांक, पावती क्रमांक, टिपा, आणि जोडलेले बिलांचे फोटो.
देणगीदारांबद्दल: कार्यकर्ता नोंदीवर जे टाकतो तेवढंच — नाव, आणि पावती पाठवण्यासाठी दिलेला असेल तर मोबाईल क्रमांक. देणगीदाराबद्दल याशिवाय काहीही गोळा केलं जात नाही आणि त्यांचं खातंही नसतं.
तुमचं मंडळ: नाव, पत्ता, नोंदणी क्रमांक, स्थापना वर्ष, लोगो आणि समितीशी संपर्कासाठीचा WhatsApp क्रमांक.
आम्ही ते का ठेवतो
अॅप चालवण्यासाठी: तुमचा हिशोब दाखवण्यासाठी, पावत्या तयार करण्यासाठी, आणि प्रत्येक सदस्याला तेच दिसावं यासाठी.
पावती पोहोचवण्यासाठी: देणगीदाराचा मोबाईल क्रमांक फक्त ती एक पावती पाठवण्यासाठी WhatsApp कडे जातो. देणगीदारांना दुसरा कोणताही संदेश जात नाही आणि त्यांची कोणतीही प्रोफाइल आम्ही बनवत नाही.
पेमेंट घेण्यासाठी: प्लॅन किंवा पावत्या विकत घेताना पेमेंट Razorpay हाताळतं. काय घेतलं आणि कधी एवढीच नोंद आम्ही ठेवतो. तुमचे कार्ड किंवा UPI तपशील आम्हाला दिसत नाहीत आणि आम्ही ते साठवत नाही.
तुमच्या नोंदी कुणाला दिसतात
फक्त तुमच्याच मंडळाच्या, अॅडमिनने मान्यता दिलेल्या सदस्यांना. भूमिका ते आणखी मर्यादित करतात — कार्यकर्त्याला फक्त स्वतःच्या नोंदी दिसतात.
दुसरं कोणतंही मंडळ तुमचा हिशोब वाचू शकत नाही. हे फक्त अॅपमध्ये नाही, तर डेटाबेसमध्येच बंधनकारक केलेलं आहे.
तुम्ही मांडलेली अडचण सोडवण्यासाठी लागलं तर आमची सपोर्ट टीम मंडळाच्या नोंदी पाहू शकते. अशी प्रत्येक वेळ — कुणी पाहिलं, कधी आणि का — नोंदवली जाते.
आम्ही तुमचा डेटा विकत नाही, जाहिरातदारांना देत नाही, आणि कशाच्याही प्रशिक्षणासाठी वापरत नाही.
तो कुठे राहतो
Google Firebase मध्ये, Google Cloud च्या सर्व्हरवर. प्रवासात सर्व माहिती एन्क्रिप्ट केलेली असते.
पावतीच्या इमेज तुमच्या फोनवर तयार होतात आणि WhatsApp वर पाठवता याव्यात म्हणून साठवल्या जातात.
किती काळ ठेवतो
तुमचं मंडळ सेवा वापरत आहे तोपर्यंत — कारण मंडळाचा हिशोब वर्षांनंतरही मागे वळून पाहण्यासाठीच असतो.
मंडळ बंद केलं किंवा डेटा हटवायला सांगितलं तर 'डेटा हटवणे' पान पहा.
तुमचे पर्याय
तुमच्या भूमिकेनुसार कोणतीही नोंद अॅपमधून दुरुस्त किंवा काढून टाकता येते.
संपर्क पानावरील पत्त्यावर लिहून तुमच्या मंडळाच्या डेटाची प्रत मागू शकता, किंवा तो हटवायला सांगू शकता.
नोंद काढून टाकल्यावरही पावती क्रमांक पुन्हा वापरला जात नाही — बुकात पडलेला खाडाच ऑडिटर विचारतो.
लहान मुलं
ही सेवा मंडळाचा हिशोब सांभाळणाऱ्या समिती सदस्यांसाठी आहे, लहान मुलांसाठी नाही.
बदल
या धोरणात महत्त्वाचा बदल झाला तर हे पान गुपचूप बदलण्याऐवजी आम्ही अॅपमध्ये तसं सांगू.